मुक्ताईनगरात 26 लाखांचा गुटखा जप्त : चौघांना अटक


Gutkha worth 26 lakh seized in Muktainagar : Four arrested मुक्ताईनगर : जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाने दोन वाहनातून होणारी गुटख्याची तस्करी रोखत तब्बल 26 लाख 52 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्यात गुटख्याला बंदी असलीतरी चोरट्या मार्गाने वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने सापळा रचत मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर दरम्यानच्या पूर्णा नदीजवळ (एम.एच.20. ई.एल.5849 आणि एम.एच.20 ई.एल. 1737) या क्रमांकांच्या दोन वाहनांमधून 26 लाख 52 हजार 520 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी मसाला तसेच नऊ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 35 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौघांना अटक : गुटख्याचे बर्‍हाणपूर कनेक्शन
या प्रकरणी वाहन चालक शकील रशीद शेख (26, पटेल नगर, छत्रपती संभाजीनगर) व क्लीनर फैजान इम्रान काचालिया (22, सईदा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) तसेच दुसर्‍या वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख ईस्माईल (हर्सल, नायगाव, छत्रपती संभाजीनगर) व क्लीनर शेख फरहान शेख शाहनवाज (35, एस.टी.कॉलनी, कटकटी गेट, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह जळगाव येथील सुशील रमेश गेही आणि बर्‍हाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचा संचालक आशिश बुद्राणी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील पहिल्या चार संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरीत दोघांचा शोध सुरू आहे. या संदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डीवायएसपी प्रताप शिकारे व प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेढे, विजय पवार आदी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !