भुसावळ विभागात दुसर्या दिवशीही गारपीटीचा तडाखा : वृक्ष उन्मळली, वाहतूक ठप्प
भुसावळ : भुसावळसह परीसरात दुसर्या दिवशीही अवकाळीने दमदार हजेरी दिली तर तालुक्याला सलग दुसर्या दिवशी गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकर्यांना पुन्हा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आमोदा ते बामणोद रस्त्यावर वादळामुळे अनेक झाडे उन्मळताच वाहतूक ठप्प झाली तर वांजोळ्यात झाडाची फांदी अंगावर पडून दोन बैल जखमी झाले.
उन्हाळी कांद्याला बसला फटका
अवकाळी पावसाने उन्हाळी कांदा पिकाला फटका बसला आहे. शहरात गुरूवारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वारासह अवकाळी पाऊसाला सुरूवात झाली. शहरात 40 मिनिटे पाऊस झाला तर काही भागात बोराच्या आकारा इतक्या गाराही पडल्या. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील वांजोळा, मिरगव्हाण, गोजोरे या रस्त्यावर सुध्दा झाडे पडल्याने वांजोळ्यापासून बसेस परत न्याव्या लागल्या तर भुसावळ आगराच्या बस चोरवड, बेलव्हाय मार्गे नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.
