यावल बाजार समितीसाठी 93.63 टक्के मतदान : रविवारी भाग्याचा फैसला
93.63 percent polling for Yaval Bazar Samiti: Fate decided on Sunday यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शुक्रवारी 18 जागांसाठी 41 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान झालेल्या मतदान प्रक्रियेत तीन मतदान केंद्रात दोन हजार 604 मतदारांपैकी दोन हजार 438 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर सार्वत्रिक निवडणुकी 93.63 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यावलसह फैजपूरसह साकळी येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, रविवारी यावल पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी होणार असून निकालाकडे राजकीय समीक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.
तीन मतदान केंद्रावर मतदान
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शुक्रवारी मतदान पार पडले. यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, फैजपूर शहरातील मुन्सिपल हायस्कूल व साकळी येथील शारदा विद्या मंदिर या तीन ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या तिन्ही मतदान केंद्रावर सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, हमाल मापाडी मतदारसंघ व व्यापारी मतदारसंघातील एकूण दोन हजार 604 मतदारांपैकी दोन हजार 438 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण 93.63 टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण, सहाय्यक एम.पी.भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सर्वच ठिकाणी सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती व शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
मतदान केंद्राच्या बाहेर भाजपा-शिंदे गट शिवसेना युती प्रणित सहकार पॅनल तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट सेनेच्या महाविकास आघाडी प्रणित शेतकरी पॅनलच्या वतीने मतदार मदत कक्ष उभारण्यात आले. या ठिकाणी उमेदवार थांबून होते. तिन्ही मतदान केंद्रावर अनुचित प्र्रकार घडू नये म्हणुन फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
आमदार शिरीष चौधरींसमक्ष वाद
मतदान केंद्राबाहेर 100 मीटर लांब थांबावे या कारणावरून आमदार शिरीष चौधरी यांच्या समक्ष पोलीस व उमेदवारांमध्ये वाद झाला होता. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी येवून गैरसमज दुर करीत वाद मिटवला. दोन्ही गटातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी गर्दी केली होती.
