रावेर कृऊबा निवडणुकीसाठी 95.62 टक्के मतदान : उद्या निकाल
95.62 percent polling for Raver Kruba elections : Results tomorrow रावेर : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 95.62 टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दोन हजार 652 मतदारांपैकी दोन हजार 536 मतदारांनी आपला हक्क बजावला. रावेर कृषी उपन्न बाजार समिती महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल, भाजपा-सेना पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनल व जनशक्ती प्रहार पुरस्कृत परीर्वतन शेतकरी पॅनलसह अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. 18 जागांसाठी 51 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून मतदार कुणाच्या पार मतांचा कौल देतात हे शनिवारच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
आज होणार मतमोजणी
रावेरातील यशवंत विद्यालयात निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विजय गवळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी फकीरा तडवी यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी सचिव गोपाळ महाजन, कमलेश पाटील, संतोष तायडे मतदान प्रक्रियेत सहकार्य केले. सकाळी मतदान केंद्राला तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी भेट दिली. फौजदार विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार राजेंद्र करोडपती, सचिन घुगे, नंदकिशोर महाजन, सुकेश तडवी, पुरूषोत्तम पाटील यांनी बंदोबस्त ठेवला. शनिवार, 29 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रावेर शहरतील स्वामी विवेकानंद शाळेत एकूण 14 कर्मचारी सात टेबलांवर मतमोजणी करतील.

रावेर बाजार समितीसाठी 95.62 टक्के मतदान
रावेर शहरातील यशवंत विद्यालयात सात बुथवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. दोन हजार 652 मतदारांपैकी दोन हजार 536 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोसायटी मतदार संघात 746 पैकी 727 मतदारांनी, व्यापारी मतदार संघात 763 पैकी 705 तसेच हमाल-मापाडी 234 पैकी 226 मतदारांनी हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात 909 पैकी 878 मतदारांनी हक्क बजावला. दुपारी दोननंतर मतदार केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली तर दोन ते चार दरम्यान सर्वाधिक मतदान झाले.
