बोदवड बाजार समितीत आमदार खडसे किंगमेकर : 17 जागांवर वर्चस्व, आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का
बोदवड : बोदवडसह मुक्ताईनगर वरणगाव कार्यक्षेत्र असलेल्या बोदवड बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीच्या तब्बल 17 जागा निवडून आल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे किंगमेकर ठरले आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी बोदवड शहरातील अग्रसेन भवनात सकाळी साडेदहा वाजेपासून सुरू झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व गटांचे निकाल हाती. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद बहुमत मिळवले तर शिवसेना (शिंदें) भाजप गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
आमदार एकनाथ खडसेंची चालली जादू
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील व आमदाी एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 94.55 टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली.

शिंदे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान
सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या दोन फेर्यांमध्ये शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे उमेदवार जयपाल बोदडे यांनी मुसंडी मारत आगेकूच केली. दरम्यान ही एकमेव जागा शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांना प्राप्त झाली आहे. उर्वरीत सर्व 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निर्विवाद बहुमत सिद्ध केले. निकालानंतर बोदवडसह मुक्ताईनगर आणि वरणगाव परीसरातील राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
