खडकदेवळा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडाल्याने मृत्यू
A young man who went swimming in Khadakdevla dam died due to drowning पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. गोविंद समाधान मोरे (23, वाडे-गुढे, ता.भडगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.
नातेवाईकांकडे आल्यानंतर दुर्घटना
गोविंद हा युवक गुरुवार, 27 एप्रिल रोजी तालुक्यातील खडकदेवळा येथील मावशीकडे आला असता रविवार. 30 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावात कळाल्यानंतर परीसरातील पट्टीच्या पोहणार्यांनी गोविंदचा शोध घेतला असता गोविंदचा मृतदेह आढळून आला नाही. 1 मे रोजी होडीच्या साहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरू केल्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोविंदचा मृतदेह आढळून आला. गोविंद याचा मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे. मयत गोविंद मोरे याच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, चार बहिणी असा परीवार आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.


