आधी कंपनीत केले विषप्राशन नंतर साडीने घेतला गळफास : जळगावात खळबळ


An employee committed suicide in a company within MIDC limits in Jalgaon जळगाव : एमआयडीसी हद्दीतील साईराम ट्रेडींग कंपनीतील 36 वर्षीय तरुणाने सुरूवातीला विषारी औषध सेवन करून व नंतर गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. संजय बंडू शेवाळे (36, रा. विखरण, ता.शिरपूर, धुळे, ह.मु.मेहरूण, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाने गळफास घेतला नसून संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून याबाबत एमआयडीसी पोलिसांकडे मात्र तक्रार करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्यरात्री आत्महत्येचा संशय
संजय बंडू शेवाळे हा गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील मेहरूण परीसरात आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. संजय हा एमआयडीसी परीसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवार, 30 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला होता. सोमवारी 1 मे रोजी कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी हा साफसफाई करण्यासाठी गेला असता लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस कर्मचार्‍यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, संजय याने आधी विषारी औषध घेतले त्यानंतर गळफास घेतले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान तरुणाची आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (4) आणि सलोनी (6) ही दोन मुले आहेत. प्राथमिक तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !