जळगावसह जिल्ह्यात आज व उद्या कोसळणार अवकाळी मुसळधार पाऊस !


Unseasonal heavy rain will fall today and tomorrow in the district including Jalgaon! जळगाव : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असतानाच जिल्ह्यासाठी पुन्हा गुरुवारी व शुक्रवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून यादरम्यान वादळी वार्‍यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

या जिल्ह्यात पुढील 24 तास महत्त्वाचे
हवामान खात्याच्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांना वादळी वारा, ढगांचा गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे 24 तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. जळगावला आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस
राज्यातील मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे दोन दिवस तर विदर्भामध्ये पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तापमानात झाली घट
राज्यावर अवकाळीचे ढग कायम असल्याने सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जळगावमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाचा पारा सुमारे 45 अंशावर पोहोचल तर आता बदलत्या हवामानामुळे तापमानाचा पारा 40 अंशाखालीच आहे. यामुळे जळगावकरांना सध्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळत असला तरी येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !