पाचोर्यात अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर : ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाचा मृत्यू
आतातरी पोलीस व महसूल यंत्रणेकडून कठोर कारवाईची अपेक्षा
Illegal sand transport in Pachorya: Driver dies due to burst tire of tractor पाचोरा : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्यानंतर झालेल्या अपघातात चिंचखेडा येथील चालक युवकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधील वाळू दुसर्या वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर झोपलेल्या महसूल यंत्रणेसह पोलीस प्रशासनाला जाग येणार का ? वाळू माफियांवर कारवाईची हिंमत यंत्रणा दाखवणार का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास अपघात
गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प समोर घडला. या अपघातात ट्रॅक्टरवरील चालक पवन हिंमत पाटील (20, चिंचखेडा खुर्द) याचा मृत्यू ओढवला. मयत युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी करीत नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवला.
वाळू वाहतुकीदरम्यान अपघात ?
गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटल्याने ट्रॅक्टर जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व त्यानंतर उलटले. या अपघातात पवन हिंमत पाटील यांच्या डोक्याला व चेहर्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तत्काळ तुटलेला खांब व वाळू दुसर्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. मयत चालक पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिंमत पाटील हे सारोळा बु ता. पाचोरा येथील अविनाश देशमुख यांच्याकडे मजूरी करतात. पवन याच्या पश्चात बहिण व वृद्ध आई, वडील असा परीवार आहे.


