भुसावळ शहरातील लक्ष्मी नगरात धाडसी घरफोडी


Daring burglary in Lakshmi Nagar of Bhusawal city भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील प्रीमीयर हॉटेल समोरील लक्ष्मी नगरात घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 16 हजार आठशे रुपयांचा ऐवज लांबवला. हा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. चोरट्यांनी भरदिवसा दुपारी चोरी केल्याची शंका आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असताना पोलीस यंत्रणा करते तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर घनश्याम नारखेडे (65, लक्ष्मीनगर, भुसावळ) हे लक्ष्मी नगरात वास्तव्यास असून ते कुटूंबासह पुणे येथे गेल्याने शनिवार, 27 रोजी सकाळी साडेसात ते रात्री सव्वाआठ दरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चांदीचे शिक्के, बिस्कीट, चांदीचा तुकडा, कमरेटा पट्टा असा एकूण 15 हजारांचा ऐवज तसेच एक हजार आठशे रुपयांची रोकड लांबवली. नारखेडे यांनी रविवारी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.


कॉपी करू नका.