बोदवडमध्ये किराणा मालाच्या गोदामाला आग : लाखोंचे नुकसान
Food godown fire in Bodwad : loss of lakhs बोदवड : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किराणा मालाची साठवणूक केलेल्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीचा भडका वाढत गेल्याने लाखो रुपयांचा किराणा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्थानिक नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तर जामनेर पालिकेचा बंब तब्बल दोन तासांनी दाखल झाला. आगीचे कारण अस्पष्ट असलेतरी शॉर्ट
सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लाखो रुपयांचा किराणा खाक
बोदवड शहरातील बस स्थानकाच्या मागच्या बाजूला रुपम प्रोव्हिजनचे मालक योगेश बरडीया यांचे किराणा मालाचे गोदाम आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक या गोदामाला आग लागली. आगीमुळे तेलासह साखर, मीठ व अन्य संसारोपयोगी वस्तू आगीच्या विळख्यात सापडत गेल्याने लाखो रुपयांचा किराणा माल जळून खाक झाला. जामनेर पालिकेचा बंबाला पाचारण करण्यात आले मात्र तब्बल दोन तासानंतर आग विझवण्यासाठी बंब दाखल झाला मात्र तो पर्यंत मोठे नुकसान झाले होते. गोदामात मीठाचा साठा अधिक असल्याने आग अधिकच भडकली.
नगरपंचायतीकडे बंब कधी येणार
बोदवड ग्रामपंचायतीचे होवून आता नगरपंचायतही झाली मात्र अद्यापही नगरपंचायतीकडे स्वतःचा अग्निशमन दलाचा बंब नाही. स्थानिक स्तरावर बंब राहिला असता तर कदाचित वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले असते मात्र किमान या घटनेनंतरही तरी जागृत लोकप्रतिनिधींनी अग्निशमन बंब उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
