चिनावलच्या प्रौढाचा मुक्ताईनगरात निर्घूण खून
खुनाचे कारण अस्पष्ट : दगडाने ठेचून केली हत्या ; पोलीस अधीक्षकांची धाव
An adult of Chinawal was brutally murdered in Muktainagar मुक्ताईनगर : शहरातील सातोड शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात 46 वर्षीय प्रौढाचा निर्घृण खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली. सुरूवातीला अनोळखी असलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मयत हा चिनावल, ता.रावेर येथील रवींद्र मधुकर पाटील (46) असल्याचे स्पष्ट झाले. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
दगडाने ठेचून केली हत्या
मुक्ताईनगर शहराजवळील सातोड शिवारातील बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर नाल्यात रवींद्रचा मंगळवारी मृतदेह आढळला. मारेकर्याने चेहर्यावर मोठ्या प्रमाणावर दगडाचे वार केले तसेच डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा यंत्रणेला संशय आहे.
पोलीस अधीक्षकांची भेट
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, परीविविधीन डीवायएसपी सतीश कुलकर्णी, प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे, पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक पथकाने धाव घेत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला असून बुधवारी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मयताचा योगेश मधुकर पाटील (40, चिनावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
