रावेरात बचत गट कर्मचार्‍याच्या डोळ्यात तिखट टाकून 67 हजार लुटले


67,000 was looted in Ravera by putting pepper in the eyes of a Sahajt group employee रावेर : बचत गट कर्मचारी वसुलीची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्ता अडवत व डोळ्यात तिखट टाकून 67 हजार 143 रुपयांची रोकड लुटल्याची घटना आटेवडा-मोरगाव रस्त्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. भर दिवसा झालेल्या लुटीनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा रोकड लुटल्याने खळबळ
बचत गट बँक कर्मचारी आकाश अनिल पाटील (रा.जुना सावदा रोड, रावेर) हा गुरुवार, 8 रोजी अटवाडे येथून बचत गटाचे वसुलीचे पैसे घेऊन मोरगाव मार्गे रावेरच्या दिशेने येत होता. मोरगावनजीक रस्त्यात पुलाजवळ बँक कर्मचारी आकाश पाटील याला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अडवले व त्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून त्याच्या जवळील 67 हजार 143 रुपयांची रोकड लुटली. या घटनेनंतर घाबरलेल्या आकाश पाटील यांनी रावेर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार सचिन नवले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !