वीज चोरी भोवली : डोणगाव येथील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
यावल : तालुक्यातील डोणगाव येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात गावात सहा जण वीज चोरी करतांना आढळले. या सर्व सहा जणांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र, त्यांनी दंड भरला नाही. दंड न भरल्याने या सहा जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डांभूर्णी कारवाईने उडाली खळबळ
डांभूर्णी, ता.यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता तुषार पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील डोणगाव या गावात आपल्यासह वीज तंत्रज्ञ सरफराज तडवी, किशोर कोळी, ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील या पथकासह वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये जयराम मधुकर भालेराव, देवानंद प्रकाश भालेराव, संजय माधव पाटील, प्रवीण आनंदा ठोके, आनंदा मुकुंदा पाटील व शांताराम बाबुराव शिरसाड हे सहा जण वीज चोरी करतांना आढळून आले. तेव्हा या सहा जणांविरुद्ध त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून त्यांना नोटीस बजविण्यात आली मात्र या सर्वांनी दंड भरला नाही. दंड अदा न केल्याने या सहा जणाविरूध्द यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.
