ज्येष्ठ नागरीकांनी एकमेकांचे आधारवड बनावे

जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभेत डीवायएसपी कृष्णांत पिंगळे


भुसावळ : ज्येष्ठांनी एकमेकांचे आधारवड बनावे व प्रचंड सकारात्मक व आशावादी राहून एकमेकांच्या नात्यांची वीण घट्ट करावी, असे आवाहन भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी येथे केले. श्री जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाची साप्ताहिक सभा संघाध्यक्ष आर.आर.बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणपती मंदिरात झाली. याप्रसंगी पिंगळे बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे व फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रथम सत्रात वक्त्या डॉ.सुधा खराटे यांनी ज्येष्ठांनी शारीरीक व मानसिक आरोग्याची जपणूक नित्य व्यायाम व योगासने याद्वारे सोप्या पद्धती ने कशी करावी हे स्पष्ट केले. सल्लागार दिनकर जावळे यांनी प्रमुख अतिथींचा परीचय दिला.

फेक कॉलपासून सावध रहा : बँक व्यवहारादरम्यान काळजी घ्या
पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले की, हल्ली ज्येष्ठांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. फेक कॉलद्वारे भामटे बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याचा तपशील व तसेच एटीएम पीन विचारतात त्यामुळे अशा कॉलला कुठलीही माहिती देवू नये, व्यवहार करताना एटीएम कुणाच्याही हातात देवू नका, पेन्शनचे पैसे काढताना अनोळखी व्यक्तींकडून मदत मागू नका अथवा स्लीप भरून घेवू नका, व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकद्वारे मेसेजद्वारे हनीट्रॅप सारखा प्रकार होऊ शकतो त्यामुळे अशावेळी सावध राहण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावरून चालताना पुढे दंगल सुरू आहे आणि तुमचे दागिने रुमालात काढून ठेवा, असे सांगून विश्वासघाताने दागिने लांबवले जातात त्यामुळे अशावेळी सावध रहावे तसेच मुलांनी वृध्द आई-वडिलांची काळजी न घेतल्यास अशा मुलांवर कायदेशीर कारवाईदेखील होवू शकते शिवाय ज्येष्ठांना मदत हवी असल्यास ती पोलिसांकडून निश्चित मिळेल, असेही ते म्हणाले. सभा अध्यक्ष तथा संघाचे अध्यक्ष आर.आर.पवार यांनी ज्येष्ठांनी शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमितपणे योगासने व व्यायाम करावा व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक संतुलन कसे राखावे हे दोन कथांद्वारे सांगितले. सल्लागार प्रकाश विसपुते यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डी.एम.तिडके यांनी केले. यशस्वीतेसाठी संघ कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व संघाचे सभासद यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !