खासदार शरद पवार यांना धमकीचा भुसावळात निषेध
Threat to MP Sharad Pawar condemned in Bhusawal भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भुसावळातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनीही धमकीचा निषेध करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली. साहेबांची मोठी कामगिरी असताना निलेश राणेंसारखे काही लोकं त्यांच्यावर राजकीय संस्कृतीला अशोभनीय भाषेत टीका करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
धमकी देणार्यावर अटकेची व्हावी कारवाई
खासदार पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणार्या व्यक्तीवर तत्काळ कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा व दोषीवर अटकेची कारवाई करावी व पवार साहेबांचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे गृहमंत्री जबाबदार राहतील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, गट प्रमुख लक्ष्मण सपकाळे, सलीम तडवी, लल्ला मोरे, गणेश पाटील, गणेश भारंबे, मोहित जोशी, कृष्णा काके, किशोर सपकाळे, मंगेश पाटील, भास्कर दोडे आदी उपस्थित होते.

