रावेर पीपल्स बँक निवडणुकीत लोकमान्य पॅनलला बहुमत
Lokmanya panel wins majority in Raver People’s Bank elections रावेर : शहरातील रावेर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात शनिवारी झाल्यानंतर रविवारी निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली. त्यात लोकमान्य पॅनलला सात जागांवर बहुमत मिळाले तर सहकार पॅनलला सहा जागा मिळाल्याने लोकमान्य पॅनलचे आता बँकेवर वर्चस्व राहणार आहे. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
13 टेबलावर मतमोजणी
रावेर पीपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार, 10 जून रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यात 61.68 टक्के मतदान झाले. लोकमान्य आणि सहकार पॅनलमध्ये अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. निवडणुकीनंतर रविवार, 11 जून रोजी शहरातील कमलाबाई एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी होते. मतमोजणी पर्यवेक्षक प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मतपत्रिकांचे मतदार संघनिहाय वर्गीकरण करून गठ्ठे करण्यात आले. 13 टेबलावर मतमोजणी कर्मचार्यांनी मतमोजणी केली.

या उमेदवारांनी मिळवला विजयी
सर्वसाधारण मतदार संघात- प्रल्हाद रामदास महाजन (2188), मानस अरुण कुलकर्णी (1795), राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (1771), पंकज राजीव पाटील (1725), सोपान बाबुराव पाटील (1965), सोपान साहेबराव पाटील (1837), संजय गंगाधर वाणी (1794), राजेश सुधाकर शिंदे (1716), महिला राखीव मतदार संघात- पुष्पाबाई गणेश महाजन (1897), मिराबाई चंपालाल राऊत (1835), इतर मागासवर्ग मतदार संघातील दिलीप हिरामण पाटील (2135), विमुक्त जाती-जमाती भटक्या जमाती मतदार संघात अॅड.प्रवीण सुपडू पाचपोहे (2172), अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात विनोद नारायण तायडे (1917) हे विजयी झाले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले, मनोहर जाधव, राजेंद्र करोडपती, पुरूषोत्तम पाटील आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
