दक्षिण आफ्रिकेत उंचावले नाव : भुसावळचे डॉ.तुषार पाटील ठरले भुसावळचे पहिले कॉम्रेड मॅरेथॉन रनर
दक्षिण आफ्रिकेत 87.7 किमी धावून उंचावले भुसावळ शहराचे नाव : शहरात जल्लोषात स्वागत
Name raised in South Africa: Dr. Tushar Patil of Bhusawal became the first comrade marathon runner of Bhusawal भुसावळ : भुसावळ स्पोर्टस् अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू व शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.तुषार पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध व प्रतिष्ठीत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये 87.7 किलोमीटर अंतर 11 तास 39 मिनिटात धावून यशाला गवसणी घातली. अशी कामगिरी बजावणारे ते भुसावळ शहरातील प्रथम धावपटू ठरले. याआधी जिल्ह्यातून केवळ जळगावचे निलेश भांडरकर यांनी तीन वर्षापूर्वी ही स्पर्धा यशस्वीपणे निर्धारीत वेळेत पूर्ण केली आहे.
भुसावळ शहराचे उंचावले नाव
रविवार, 11 जून रोजी स्थानिक वेळेनुसार दक्षिण आफ्रिकेतील पीटर्सबर्ग येथून ठिक 5.30 वाजता स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जगभरातून सुमारे 18 हजार धावपटू यामध्ये सहभागी झाले. ठिक 12 तासांनी उतार उतरून डरबन येथे संध्याकाळी 5.30 वाजता 96 व्यांदा ही स्पर्धा पार पडली. स्थानिक धावपटूनंतर परदेशातील सर्वाधिक 403 धावपटू भारतीय होते. दरम्यान, डॉ.तुषार पाटील यांच्यामुळे भुसावळचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.

भुसावळात जल्लोषात स्वागत
डॉ. तुषार पाटील यांचे बुधवारी सकाळी शहरात आगमन झाल्यानंतर स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू, सायकलपटू व जलतरणपटूंनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केल्याचे प्रा.प्रवीण फालक व प्रवीण पाटील यांनी सांगितले.
