युरीयासोबत इतर खतांची लिंकिंग केल्यास बहिष्कार टाकणार
रावेर अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत विक्रेत्यांचा निर्धार
रावेर : यंदाच्या खरीप हंगामात युरीयासोबत इतर खते, कीटकनाशके, महागडी विद्राव्य खते जबरदस्ती लिंकिंग केल्यास रावेर तालुक्यातील कोणताही खत विक्रेता युरीयाा घेणार नाही व युरीयावर बहिष्कार टाकेल, असा निर्धार रावेरात झालेल्या अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत यंदा होऊ घातलेल्या खरीप हंगामाबाबत तसेच युरीयासोबत येणार्या इतर अतिरीक्त खतांच्या लिंकिंग बाबत महत्वाची चर्चा झाली. यापुढे लिंकिंगबाबत खास निर्णय घेण्याबाबतचे आवाहन एका निवेदनाद्वारे जळगाव जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांना रावेर संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिले.
शेतकर्यांच्या रोषाचा विक्रेत्यांना मनस्ताप
गेल्या महिनाभरात रावेर तालुक्यात गारपीट, वादळी वारे, बेमोसमी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी व केळीच्या कमी झालेल्या बाजारभावाने केळी उत्पादक त्रस्त आहे. त्यातच रासायनिक खत कंपन्या युरीयासोबत मोठ्या प्रमाणावर लिंकिंग देत असल्याने तालुक्यातील खत विक्रेत्यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. युरीयासोबत लिंकिंग न घेतल्यास खत मिळत नाही त्यामुळे दोन्ही बाजूंनी खतविक्रेत्यांची कोंडी होत आहे. त्यापेक्षा अशा युरीयाला खरेदी न करता त्या रॅकवर आम्ही बहिष्कार टाकू, अशी माहिती रावेर अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिली. लिंकिंगचा त्रास असाच सुरू राहिल्यास पूर्ण रावेर तालुक्यातील खत विक्रेते आपले पॉस मशीन कृषी विभागाकडे परत देतील, अशी माहिती ही निवेदनात देण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीस रावेर अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव युवराज महाजन, ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत अग्रवाल, सुनील कुलकर्णी, डॉ.जी.एम.बोंडे, जितेंद्र महाजन, प्रवीण पाटील, जितेंद्र महाजन, रवींद्र बारी, अमोल लोखंडे, प्रदीप महाजन, गणेश महाजन, नंदू पाटील, जितेंद्र पाटील, राहुल शिंदे, यादवेंद्र माळी, वैभव चौधरी, विशाल पाटील, नितीन पाटील, धीरज पाटील यांच्यासह अन्य विक्रेते उपस्थित होते.
