पथराडे शेत-शिवारातून 15 हजारांचे ठिबक नळ्या व पाईप चोरी
यावल : तालुक्यातील पथराडे शेत शिवारातून शेतकर्यांनी शेतात ठेवलेल्या ठिबक नळ्या आणि पाईप अज्ञात चोरट्याने लांबवले. शेतात एकूण पंधरा हजार रुपयांचे हे साहित्य चोरी झाल्याचे सकाळी निदर्शनास आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अद्यात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अद्यात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
पथराडे, ता.यावल येथील शेत-शिवारात विजय नवल चौधरी (थोरगव्हाण) यांचे शेत गट क्रमांक 45 आहे. यात त्यांनी शेतातील पिकासाठी पाणीपुरवठा करण्याकामी ठिबकच्या नळ्या आणि पाईप ठेवले होते. मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतात ठेवलेल्या ठिबक नळी आणि पाईप असा पंधरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
