जांभळीतील खुनाचा उलगडा मात्र मृतदेहाबाबत संशयिताचे तोंडावर बोट
The explanation of the murder in Jambli, but the finger of the suspect about the body जळगाव : जामनेर तालुक्यातील जांभळी येथील मागील 40 दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मित्रानेच खून केल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले तर आरोपीने खुनाची कबुलीदेखील दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली मात्र मृतदेह अद्यापही पोलिसांना सापडला नसल्याचे या प्रकरणात गुढ वाढले आहे. मृतदेह नेमका कुठं?, त्याची विल्हेवाट कशी आणि कुठं लावली?, याबाबत मात्र आरोपीने तोंडावर बोट ठेवल्याने मयताचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान जळगाव पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कैलास विठोबा वडाळे (49, रा.जांभळी, ता.जामनेर) असे मयताचे तर रमेश संपत मोरे (54, रा.वडाळी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुन्हा उघडकीस मात्र मृतदेह मिळेना
कैलास वडाळे यांची रमेश संपत मोरे यांच्यासोबत घट्ट मैत्री असूनही मित्र बेपत्ता झाल्यानंतरही रमेश याने कधीही कैलास यांच्या परीवाराशी संपर्क केला नाही. अगदी कुटुंबाकडे साधी विचारपूससुद्धा केली नव्हती तसेच मयत कैलास यांच्यासोबत शेवटी त्यालाच बघण्यात आल्याने 20 जूनला स्थानिक गुन्हे शाखेने रमेश मोरे याला चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कैलास वडाळे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांना घटनास्थळ दाखवले. घटनास्थळी मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू सापडल्या मात्र कैलास वडाळे यांचा मृतदेह मिळाला नाही.
मद्यप्राशन केल्यावर उफाळून आला वाद !
13 मे रोजी रमेश व कैलास दोघांनी जांभूळ गावाजवळ एका शेतात बसून सोबत रात्री मद्यप्राशन केले. याचदरम्यान रमेश आणि कैलास यांच्यात वाद झाला. या वादातून रमेश याने कुर्हाडीने कैलास यांच्यावर वार केला, त्यानंतर दगड मारला. यात कैलास यांचा मृत्यू झाल्याची कबुली रमेशने पोलिसांकडे दिली. तर मुलगा अविनाश याने दिलेल्या फिर्यादीत रमेश मोरे याने वडिलांकडून 20 हजार उसने घेतले होते, असे म्हटले आहे. मात्र हत्येच्या नेमक्या कारणाचा खुलासा झालेला नाही. या प्रकरणात आणखीही संशयितांची चौकशी सुरु आहे.
मृतदेहाबाबत आरोपीचे तोंडावर बोट
रमेशने कैलास यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना मयत कैलास यांचा मोबाईल, बुट, आधार कार्ड, पावत्या, पँन्टचे कापड, रूमाल आणि कुर्हाड असे साहित्य सापडले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेला रमेश हा कैलास यांच्या मृतदेहाबाबत कुठलीही माहिती पोलिसांना देत नाहीए. पोलिसांनी सर्व पद्धतीने त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली, मृतदेह कुठे आहे, याबाबत रमेश काहीच बोलायला तयार नाही.
पहूर पोलिसांकडून अटक, तोरनाळा जंगलात शोध
कैलास यांचा मृतदेह शोधण्यासाठी एलसीबी पथक व पहूर पोलिसांनी रमेशला दिवसभर घेऊन घटनास्थळ शोधले. तोरनाळा, ता.जामनेर येथे मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्याप्रमाणे रात्री पोलिसांनी तोरनाळा जंगल पिंजून काढले. पण मृतदेह आढळला नाही. त्यामुळे कैलास यांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठं लावली?, हे शोधून काढण्याचे जळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.