गिरणा नदीपात्रात बांभोरीतील 22 वर्षीय युवकाची हत्या
धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा : गावात उडाली खळबळ
A 22-year-old youth from Bambhori was killed in the Girna river basin जळगाव : बांभोरी गावातील 22 वर्षीय युवकाची अज्ञाताने डोक्यात धारदार शस्त्र मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आशिष प्रकाश शिरसाळे (22, बांभोरी, ता.जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुन्हे शाखेसह धरणगाव पोलिसांकडून तपासचके गतिमान करण्यात आली आहेत.
बांभोरी गावात खळबळ
आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे हा तरुण बांभोरी गावात आई-वडील व मोठ्या भावासह शनिपेठ नगरात वास्तव्याला होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले असून दोघेही भाऊ गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 23 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आशिष गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला असता अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली.

पोलीस अधिकार्यांची धाव
बराच वेळ होवूनही आकाश घरी न आल्याने शोधाशोध केल्यानंतर गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलिसांना माहिती कळवण्यात आली तर स्थानिक नागरीकांच्या मदतीने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून तरुणाला मयत घोषित केले. घटनास्थळी चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावले, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव ढमाले आदींसह पाळधी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.
