जळगावात महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना : आरोपीला अटक
आरोपीच्या ताब्यासाठी जमाव आक्रमक : पोलीस अधीक्षकांची धाव
जळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरातील समता नगरात शनिवारी पहाटे उघडकीस आली. काही वेळात हा प्रकार शहरात पसरल्यानंतर संतप्त समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन करीत दोषीला ताब्यात देण्याची मागणी केली. समाजबांधव आक्रमक झाल्यानंतर अनेक पदाधिकार्यांनी त्यांची समजूत काढण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले तसेच कायदा हातात घेणार्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देत जमावाची समजूत काढल्यानंतर आंदोलक शांत झाले. दरम्यान, रामानंद पोलिसांनी गोकुळ हंसराज राठोड (जळगाव) या संशयितास अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहाटेच्या सुमारास पुतळ्याची विटंबना
जळगाव शहरातील समता नगर भागात महापुरूषांचा पुतळा आहे. शनिवारी चार वाजता पहाटे या पुतळ्याची विटंबना संशयित गोकुळ राठोड याने केल्याचे परीसरातील नागरीकांनी पाहिल्यानंतर त्यास हटकताच संशयित पसार झाला तर नागरीकांनी पुतळा स्वच्छ पाण्याने धुतला मात्र काही वेळातच विटंबनेचा प्रकार शहरात कळाल्यानंतर समाजबांधव मोठ्या प्रमाणावर जमा झाले. आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांचे शांततेचे आवाहन
जिल्हा पोलीस अधीक्षम एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, जिल्हापेठ निरीक्षक बबन आव्हाड, रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील व कर्मचार्यांनी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी स्वतः माईकद्वारे जमावाला शांतता राखण्याचे आवाहन करीत दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, जमाव शांत झाल्यानंतर पोलीस अधिकार्यांनी महामानवाच्या पूतळ्याचे पूजन केले.
संशयिताला काही तासातच अटक
पूतळा विटबंना प्रकरणी आकाश उर्फ सनी दादाराव अडकमोल (30, समतानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गोकुळ हंसराज राठोड याच्याविरोधात पुतळा विटबंना केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाल. संशयिताला काही तासात पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, अटकेतील संशयित हा गुन्हेगार असून त्याच्या मुलाला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती व हा राग संशयित गोकुळ राठोड याच्या डोक्यात होता व त्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना पोलिसांना कामाला लावतो, अशी धमकीही दिली व त्यातून पुतळा विटंबनेचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.



