दीपनगरच्या राखेच्या प्रदूषणाचा प्रश्न बैठकीत गाजला

माजी मंत्री खडसेंनी केली प्रश्नांची सरबत्ती ; अधिकार्‍यांनी दिले आश्वासन


The issue of Deepnagar’s ash pollution came up in the meeting भुसावळ : दीपनगर औष्णिक केंद्रात सोमवारी प्रदूषणाच्या प्रश्नी माजी मंत्री एकनाथ खडसे व महानिर्मितीच्या अधिकार्‍यांमध्ये आढावा बैठक झाली. या बैठकीत खडसे व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी यांनी महानिर्मितीच्या दीपनगर केंद्रामुळे परीसरात होणार्‍या प्रदूषणाचे प्रश्न मांडले. महानिर्मितीचे व्यवस्थापकिय संचालक डॉ.पी.अनबलगन, प्रकल्प संचालक अभय हरणे, पर्यावरण विभागाचे संचालक नितीन वाघ आदींनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत दीपनगरातील राखेच्या अनियमीत वितरणाचा प्रश्नही गाजला.

प्रदूषणाबाबत असंख्य तक्रारी
दीपनगर औष्णिक केंद्रातील प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या निपटार्‍यासाठी सोमवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी पर्यावरणीय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. दीपनगर केंद्रातून मोठ्या प्रमाणात राख उडते यामुळे परिसरातील पिकांची हानी होत आहे. यासोबतच वेल्हाळे अ‍ॅश पॉडला जोडणार्‍या पाईपलाइनला अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. विविध ठिकाणी बेंड अर्थात वळण आहेत. पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या नियमांना डावलून हे व्हॉल्व्ह ठेवण्यात आल्याने पाईपलाइन चोकअप झाल्यानंतर व्हॉल्व सोडून राख बाहेर काढली जाते. ही राख परीसरातील नाल्यांमधून तलावात व भोगावती, तापी नदीचे पात्र दूषित करीत असल्याचा मुद्दा माजी मंत्री एकनाथ खडसे व जिल्हा परीरषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी यांनी मांडला.

अनधिकृत पद्धत्तीने फ्लाय अ‍ॅशची विक्री
यासोबत दीपनगरातून फ्लाय अ‍ॅश अनधिकृत पध्दतीने दिली जाते. तीन कंपन्यांचा कार्यालयीन पत्ता एकाच ठिकाणी आहे. या कंपन्यांकडून मातोश्री एंटरप्राईजेस 60 रुपये टनने राख खरेदी करुन बाजारात ती 350 रुपये टनने विक्री करते तर दुसरीकडे उद्योजकांना राख मिळत नाही, हा मुद्दा ऐरणीवर आला. यावर कारवाई करण्याचे आश्वासन एम.डी.डॉ.अनबलगन यांनी दिले. तसेेच प्रदूषणाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आश्वासन दिले. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे – खेवलकर, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंंद्र चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वेल्हाळेचे योगेश पाटील, डेबा पाटील, तळवेलचे रवी पाटील आदींसह प्रदूषणाने बाधीत गावांतील नागरिक उपस्थित होते.

फुलगावचा पाणीप्रश्न सुटणार
दीपनगर प्रदूषणाने बाधीत असलेल्या फुलगाव येथे महानिर्मितीने सीएसआरमधून पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी 2018 मध्ये राजेंद्र चौधरी यांनी केली होती मात्र अद्यापपर्यंत उपाययोजना झाली नाही. या प्रश्नी माजी मंत्री खडसे यांनी लक्ष वेधले. यावर महानिर्मितीचे एम.डी.डॉ.अनबलगन यांनी हा प्रश्न आगामी काळात तातडीने सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !