भक्ती मार्गातून चांगल्या समाजाची निर्मिती : भुसावळात पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी
भुसावळ : भक्ती मार्गातून चांगल्या समाजाची निर्मिती होते. जगात सुधारणी हवी असल्यास व्यक्तीत सुधारणा गरजेची आहे व त्यासाठी विचारांमध्ये सुधारणा गरजेची असल्याचे विचार पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी यांनी येथे व्यक्त केले. जामनेर रोडवर राजेश राका यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परीषदेत सोमवारी त्या बोलत होत्या. बुधवार, 28 जूनपासून पूज्य साध्वीजींचा सुराणा साधना भवनात चातुर्मासात प्रवेश होत आहे तर शहरातील तेरापंथ भवनात दररोज सकाळी नऊ ते दहा दरम्यान साध्वीजींचे पुढील पाच महिने प्रवचन होणार आहे.
देव, गुरु, धर्माशी जोडा नाते
पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी म्हणाले की, जगामध्ये सुधारणा करायची असेल तर व्यक्तीमध्ये सुधारणा व्हायला हवी व व्यक्तीतील सुधारणेसाठी त्यांच्या विचारात सुधारणा गरजेची आहे व हे विचार अध्यात्माच्या मार्गातून तुम्हाला मिळू शकतात. आज देशात सर्वत्र अराजकता माजली आहे मात्र समाजात वावरताना आपले वर्तन असे असावे जेणेकरून एक चांगला समाज निर्माण होईल. शहरातील जामनेर रोडवरील मुकेश मेडिकलसमोरील मोकळ्या जागेत भव्य अशा शीतलनाथ प्रभू मंदिराची उभारणी सुरू असून फेब्रुवारी 2024 मध्ये या मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

आचार्य श्री पद्मभूषण विजय रत्नसुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना होईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी साध्वी शौर्य निधीजी, साध्वी आज्ञा निधीची यांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील तेरापंथ भवनात आयोजित प्रवचनात धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक विचारांचे आदान-प्रदान केले जाईल. हे प्रवचन केवळ जैन धर्मियांसाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी खुले असणार आहे.
