मागील सरकार फेसबुक लाईव्ह आत्ताचे सरकार मात्र ‘जनतेत लाईव्ह’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Govt Facebook Live But Present Govt ‘Live In Public’: Deputy Chief Minister Devendra Fadnavis जळगाव : मागील सरकार हे दरवाजात बंद होते , ते केवळ फेसबुक लाईव्ह करीत होते मात्र आताचे सरकार हे गतिमान असून ते जनतेत लाईव्ह असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर जळगावात टिकेचे बाण चालवले. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी फडणवीस हे जळगावात आले आहेत.
कार्यक्रमास दबावाने लोकांना आणल्याचा आरोप हास्यास्पद
शासन आपल्या दारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे. लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत. तुम्ही लाखो लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला येण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपाला त्यांनी उत्तर दिले. नागरीकांची काम होत असल्याने सर्वांना कनेक्टिव्हिटी मिळत आहे, मागील सरकार हे दरवाजात बंद होते, ते फेसबुक लाईव्ह करत होते, आम्ही जनतेत लाईव्ह आहोत. आम्ही लोकांची कामे करत आहोत, त्यामुळे काही लोकांची मळमळ होते, ती बाहेर निघते आणि अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर खडसे हे भाजपातच राहिले असते
एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळे केले नसते तर आज ते परीवारात राहिले असते, असेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, काळे झेंडे दाखवून काय उपयोग होणार आहे. मूळात पोलिसांनी कुणाचीही धरपकड करू नये, असे मला वाटते. खडसेंना नवीन मालक मिळाला आहे, नवीन मालकाने सांगितले तसे ते वागत आहे. जमिनीत त्यांनी तोंड काळे केले नसते तर ते परीवारात (भाजपा) राहिले असते. अशा काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरणार नाही. आम्ही जनतेचे लोक आहेत, जनता आमच्यासोबत आहे.
सांगाडे बाहेर निघतील म्हणूनच विरोधक एकत्र
पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे ते म्हणाले आहेत. ही सगळी मंडळी का एकत्रीत आली याबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, विरोधक एकत्र येण्याचे कारण त्यांनी केलेले घोटाळे हे आहेत. आपले सांगाडे बाहेर निघतील म्हणूनच विरोध एकत्र आले आहेत. भारतातील व महाराष्ट्रातील जनतेचा मोदींवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.
