एरंडोल अपघातात ठार झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


जळगाव : पाऊस सुरू असतानाच पोलीस वाहनावर चिंचेचे जीर्ण झाड कोसळून झालेल्या अपघातात जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) हे ठार झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सायंकाळी दोघा अधिकारी व कर्मचार्‍यांवर मूळ गावी नाशिक व मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पिलखोडहून परतताना गाठले मृत्यूने
पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तत्कालीन व्यवस्थापकाच्या सहभागाने सुमारे दिड कोटींचा अपहार करीत वनविभागाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी गुरुवारी सकाळीच पिलखोड, ता.चाळीसगाव येथे शासकीय वाहनाने (एम.एच.19 एम.0751) रवाना झाले होते. दिवसभर केलेल्या चौकशीनंतर तपास पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणानजीक रात्री जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली व त्याचवेळी जीपच्या पुढील भागावर झाड कोसळताच चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत सीताराम शिंदे, भरत नारायण जेठवे व निलेश प्रकाश सूर्यवंशी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

पोलीस अधीक्षकांसह अधिकार्‍यांची धाव
अपघातानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी धाव घेत माहिती जाणली होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !