महर्षी व्यासांच्या जयघोषाने यावल नगरी दुमदुमली…!
The city of Yaval shook with the shouts of Maharishi Vyasa…! यावल : शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरू पौर्णिमा उत्सव अर्थात व्यास पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासोनारायण भगवान की जय !, अशा जयघोषात सोमवारी व्यास नगरी दुमदुमली होती. सकाळ पासुन धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते तर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली. मंदिरात आलेल्या परीसरातील दिंड्यांनी लक्ष वेधले होते तर आलेल्या भाविकांना चहा, दुध महाप्रसाद वितरण करण्यात आले.
आषाढशुध्द पोर्णिमा अर्थात गुरू पौर्णिमेनिमित्त सोमवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ ते दहा या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. पूजेचा मान मीनाक्षी व किशोर चौधरी (रा.वड्री), प्राजक्ता व पंकज पाटील (डोंगरकठोरा), उर्मिला व संतोष पाटील (रा.धानोरा) व उज्वला व देविदास नेमाडे (भुसावळ) या पाच दाम्पत्यांना देण्यात आला. या जोडप्यांच्या हस्ते व एस.के.बाऊस्कर, नितीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे पूजारी अतुल बाविसे, सारंग बाविसे, मोरेश्वर बयानी, महेश बयानी, सुनील जोशी, बिल्लु महाराज, त्रिभुवनदास बैरागी, हेमंत मुळे, मनिष बैरागी, भुषण कुळकर्णी, राजेंद्र बयानी, प्रसाद कुळकर्णी व अर्थव बयानी या ब्रम्हवृंदाची पूजा केली. त्यानंतर मंदिर दर्शनार्थ खुले करण्यात आले. आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. बुंदी व तिखट भाताचा महाप्रसाद हजारो भाविकांना वितरीत करण्यात आला. भाविकांना दर्शनार्थ अडचणी येवू नये याकरीता सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोफत चहा व दुधाचे वितरण
दर्शनार्थ आलेल्या भाविक-भक्तांना विकास दुधचे वितरक सचिन मिस्त्री यांच्या वतीने मोफत गोड दुध देण्यात आले. दिवसभर 500 लीटर दुध येथे भाविकांना वितरण करण्यात आले.
चुंचाळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी, श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमी मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या शिष्यगण परीवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी उपस्थिती देत मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांमध्ये प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे, ता.यावल येथील वासुदेव बाबा, रघुनाथ बाबा, सुकनाथ बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी गुरू पोर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येत भाविक भक्त येतात. गुरूपोर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे पाच वाजता मूर्ती अभिषेक, सहा वाजता मारुती अभिषेक, दुपारी साडेबाराला महाआरती, सायंकाळी सातला आरती, सकाळी आठपासून आरतीची वेळ सोडून भजन, भारुडे सुरू होती.
दरम्यान दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप या ठिकाणी करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी पाच वाजेपासून गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री आठ वाजता दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. गुरूपोर्णिमा उत्सवासाठी शिरपूर येथील पायी दिंडीचे आगमन झाले होते तसेच तालुक्यातील नायगाव, किनगाव, दहिगाव, सौखेडा, गिरडगाव, वाघोदा, मनवेल, साकळी भागांतील मोठ्या संख्येत भाविक दर्शनासाठी आले होते.
