Sharad Pawar राज्यात राजकीय बंड ; डॅमेज कंट्रोलसाठी मोठ्या साहेबांचा 9 व 10 रोजी जळगाव जिल्हा दौरा


Sharad Pawar on tour of Jalgaon district on 9th and 10th जळगाव : अजित पवारांनी निवडक आमदारांसोबत राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवा मैदानात उतरले आहेत. न्यायालयात नव्हे तर जनतेच्या दरबारात जावून मतांचा कौल आपण मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ एकनाथराव खडसेंसह अन्य नेते शरद पवारांसोबत असल्याने आता खासदार शरद पवार रविवार व सोमवार, 9 व 10 जुलै असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवारांचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

दौर्‍याने होणार डॅमेज कंट्रोल
अजित पवार व सहकार्‍यांनी रविवारी भाजप व शिंदे सरकारमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर राज्यात राजकारण तापले तर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हेदेखील अजित पवारांसोबत गेले आहेत. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. ते रविवार, 9 व सोमवार, 10 जुलै रोजी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

मुक्ताईनगरात होणार सभा
पक्ष संघटनेचा आढावा आणि नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांसाठी खासदार शरद पवार दौरा करणार आहेत. यादरम्यान जळगाव शहर, मुक्ताईनगर व अमळनेर आदी तीन ठिकाणी जाहीर सभादेखील होतील. ते नरडाणे येथून अमळनेर, धरणगावमार्गे जळगावला येतील, असे म्हटले जात आहे; परंतु या माहितीला जिल्हाध्यक्षांकडून दुजोरा मिळाला नाही. सविस्तर दौरा निश्चित झाल्यावर त्याची माहिती देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगरला 10 जुलै रोजी सभा होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी दिली. दरम्यान, अजित पवारांच्या गटाला पाठिंबा देत पक्षविरोधात कारवाई केली म्हणून जळगाव जिल्ह्यातील युवकच्या दोन पदाधिकार्‍यांना सोमवारीच पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !