क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने जळगावातील व्यापार्याला साडेदहा लाखांचा गंडा
A trader in Jalgaon was extorted by ten lakh जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली असतानाच जळगावातील व्यापार्याला तब्बल दहा लाख 42 हजार 600 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने किप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक केली. या प्रकरणी कैलास बजरंग परदेशी (जळगाव) यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजता जळगाव सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
जादा परताव्या आमिषाने घातला गंडा
आयात-निर्यातीचा व्यवसाय करणारे कैलास परदेशी यांना 14 मे 2023 ते 6 जुलै 2023 या दरम्यान वारंवार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला व क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यामध्ये सुरुवातीला परदेशी यांच्या मोबाईल क्रमांकावर अक्रम खान, अमित आणि सुरेश या नावाच्या व्यक्तीचा फोन आला व फिर्यादीला त्यांच्या बँक खात्यावर 39 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारल्यानंतर तेवढ्याच रकमेची क्रिप्टो करंसी दिली व फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर पुन्हा संपर्क साधून क्रिप्टो करंसीमध्ये अजून गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देऊ, असे अमिष दाखविले व सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यात एकाच वेळी पाच लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारली व त्यानंतर पुन्हा मनमित सिंग सोहेल, आशुतोष सोनी आणि करण सुरेश परदेशी या नावाच्या व्यक्तींनी व युपीआयवर पाच लाख 42 हजार 600 रुपये अशी एकूण 10 लाख 42 हजार 600 रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात आले. मात्र त्याच्या मोबदल्यात फिर्यादीस कोणतीही रक्कम अथवा क्रिप्टो करंसी परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी सायबर पोलिस ठाण्यात वरील व्यक्तींविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी सा वाजता सायबर पोलिसात वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


