सासरच्या जाच्याला कंटाळून मन्यारखेडा येथील विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांविरोधात गुन्हा
Suicide of married woman in Manyarkheda due to in-law’s torture : Crime against four people including husband नशिराबाद : जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील ममता शंकर भील (20, रा.मन्यारखेडा, ता.जळगाव) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार कुटूंबियांनी केल्यानंतर या प्रकरणी नशिराबाद पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राहत्या घरात केली आत्महत्या
भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांचा विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश भील यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता तर विवाहिता सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. गुरूवार, 6 जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती तर ही बाब सायंकाळी पाच वाजता उघडकीला आली.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी मयताची आई देवकाबाई अर्जुन भील (जोगलखोरी) यांनी नशिराबाद पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती शंकर सुरेश बागले, सासू रेखा सुरेश बागले, सासरे सुरेश रामदास बागले व नणंद सुरेखा (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहेत.
