एरंडोल शहरातील पावणेतीन लाखांच्या मोबाईल चोरीचा उलगडा : दोघे जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : नऊ मोबाईल जप्त
Mobile theft of Rs 53 lakh in Erandol city solved : Two in the net एरंडोल : एरंडोल शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकानातून पावणेतीन लाखांचे तब्बल 19 मोबाईल लांबवण्यात आले होते. या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एरंडोल पोलीस व गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींकडून 70 हजार 697 रुपये किंमतीचे नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. टिकाराम कोमल मोरे (28, एरंडोल) व पंकज मंगल वाघ (30, हिंगोणा, ता.धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोपाल देविदास दांडगे (38, अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) यांचे शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये गाळा क्रमांक 11 मध्ये हरीओम एंटरप्रायजेस नामक दुकान असून 3 जुलै रोजी रोजी सायंकाळी सात ते 4 रोजी सकाळी दहा दरम्यान चोरट्यांनी संधी साधून दुकानाचे पत्री शटरचे कुलूप तोडून दुकानातील तीन हजारांच्या रोकडसह 19 मोबाईल मिळून दोन लाख 88 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, महेश महाजन, पोलीस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, महिला पोलीस नाईक उपाली खरे, भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने रविवार, 9 रोजी दोघा आरोपींना गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीतील नऊ मोबाईल काढून दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयित प्रवीण बागुल हा पोलिसांना पाहून पसार झाला असून त्याचाही कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.


