संसाराला कंटाळलोय आम्ही , जीवनयात्रा संपवतोय…. : लोहटारला दाम्पत्याच्या आत्महत्येने खळबळ
Tired of the world, we are ending the journey of life….: Lohtar is shocked by the suicide of a couple पाचोरा : संसाराला कंटाळल्याने येथून पुढे जगण्याची इच्छा नाही, असा फोन पाचोरा पोलिसांना करीत पाचोरा तालुक्यातील लोहटारच्या वृध्द दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ईश्वर नामदेव पाटील (78) व प्रमिलाबाई ईश्वर पाटील (72) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान, शनिवारी ही घटना घडल्यानतंर दोघांना उपचारार्थ हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दाम्पत्याने सोबत त्यागले आयुष्य
लोहटार, ता.पाचोरा येथील एस.टी.महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (78) व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (72) हे दाम्पत्य अध्यात्मिक मार्गावर होते. शनिवार, 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसात ईश्वर पाटील यांनी संसाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा निरोप देत फोन ठेवला. पोलिसांनी तत्काळ लोहटार गाठले असता ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर त्यांना सुरूवातीला ग्रामीण रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
उपचार सुरू असतांना सोमवार, 10 जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली तर काही तास उलटत नाही तोच सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनीही जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करीत आहेत. दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. सोमवारी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


