जामनेर तालुक्यात तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला
कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे यंत्रणेपुढे आव्हान
A young man was killed and his body thrown in Jamner taluka जामनेर : 40 ते 45 वयोगटातील तरुणाची हत्या करून मृतदेह ओळख पटू न येण्यासाठी जंगलात फेकण्यात आल्याची बाब सोमवार, 17 जुलै रोजी दुपारी दिड वाजता उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृतदेह पोत्यात गुंडाळून ठेवल्याने पूर्णपणे कुजला असून आता ओळख पटवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा जामनेर पोलिसात दाखल करण्यात आला.
मयताची ओळख पटवण्याचे आव्हान
लहासर, ता.जामनेर गावाजवळील वनविभागाच्या सागवान जंगलात मंगळवार, 17 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत असताना त्याला दुर्गंधी आल्यानंतर त्याने खातरजमा केली असता एक पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला. ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधल्यानंतर जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकार्यांसोबत तत्काळ घटनास्थळ गाठले. बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत तरुणाची हत्या करून हात-पाय बांधून पोत्यात टाकण्यात आल्याची बाब उघडकीस आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे यांनी भेट दिली. याबाबत पोलीस कर्मचारी निलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक किरण शिंदे करीत आहेत.


