भुसावळात अखेर यावल रस्त्याच्या कामाला गवसला मुहूर्त
यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या रस्ता कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन : 12 कोटींचा निधी परत आणणार -आमदार संजय सावकारेंची माहिती
भुसावळ- शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या यावल रस्त्याच्या कामाला अखेर गुरूवारचा मुहूर्त गवसला. यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या 500 मीटर रस्ता कामाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 15 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही प्रसंगी ठेकेदाराने दिली. दरम्यान, आमदार सावकारे म्हणाले की, तीन कोटींच्या रस्ता कामांना तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच ही कामे होतील शिवाय दोन कोटीतून अन्य रस्ता कामांना प्राधान्य देण्यात येणार असून पालिकेतून परत गेलेला 12 कोटींचा निधी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
शहरातील उर्वरीत भागातही रस्ते होणार
प्रसंगी आमदार म्हणाले की, रींग रोडच्या कामांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या रस्त्याचे काम होत असून 15 दिवसात हे काम पूर्ण होणार असून एका बाजूने रस्त्याचे काम तर दुसर्या बाजूने पाईप लाईन अंथरली जाईल. शहरातील जामनेर रोडचा काही भाग, बाजारपेठेतील रस्ता, संतोषी माता हॉलजवळील रस्ता, जळगाव रोडवरील काही भाग आदी रस्त्यांची कामे तीन कोटीतून लवकरच होतील शिवाय दोन कोटीतून उर्वरीत रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील. पालिकेतून परत गेलेला 12 कोटींचा निधी परत आणण्यासाठी शासन स्तरावर बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, मुकेश पाटील, अमोल इंगळे, वसंत पाटील, पुरूषोत्तम नेमाडे, सतीश सपकाळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, गिरीश महाजन, परीक्षीत बर्हाटे, रमाशंकर दुबे, कंत्राटदार मिलिंद अग्रवाल तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


