तीन लाखांचे लाच प्रकरण : भुसावळ बाजारपेठच्या पोलीस निरीक्षकांसह तिघांना एका दिवसांची पोलीस कोठडी


3 lakhs bribe case : Bhusawal market police inspector and three arrested for one day
भुसावळ :
बायोडिझेलच्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना खाजगी ईसम ऋषी दुर्गादास शुक्ला यास बोदवड तालुक्यात अटक करण्यात आली होती तर भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून ही लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांना मंगळवार, 18 रोजी अटक करण्यात आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, लाच प्रकरणातील तिघा संशयितांना बुधवारी दुपारी प्रचंड बंदोबस्तात भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

निरीक्षकांच्या नावाने कारवाईची धमकी देत मागितली लाच
मलकापूर येथील तक्रारदार व त्यांचा मित्र शुक्रवार, 14 जुलै रोजी भुसावळात आल्यानंतर ऋषी शुक्ला यांची भेट झाली होती व तक्रारदार यांचे मित्र सारंगधर पाटील व राजीवकुमार राजकिशोर यादव यांच्याविरोधात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याने आरोपी व्हायचे नसेल तर निरीक्षक राहुल गायकवाड व सहाय्यक निरीक्षक सांगळे यांना पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे शुक्ला यांनी सांगितले होते तसेच साहेबांपुढे येवू नको अन्यथा तुला ते आरोपी करतील, अशी धमकी दिली होती. तुझ्या मित्राला साहेबांसोबत भेट घेण्यासाठी पाठव, असे सांगितल्यानंतर मंगळवार, 18 रोजी भेट घेण्याचे ठरले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनंतर लाच पडताळणी करण्यात आली व लेखी तक्रार नोंदवून घेण्यात आली.

आधी ऋषी शुक्ला नंतर अधिकारी, कर्मचारी जाळ्यात
भुसावळ-बोदवड रस्त्यावरील विचवा गावाजवळ तक्रारदार यांची ऋषी शुक्ला यांच्याशी मंगळवारी दुपारी भेट झाल्यानंतर त्यांनी लाच रक्कम स्वीकारताच शुक्ला यास अटक करण्यात आली तर लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली तर नाईक तुषार पाटील हा सुरूवातीला पसार झाला मात्र नंतर तो स्वतःहून यंत्रणेपुढे हजर झाल्याने त्यासदेखील अटक करण्यात आली.

तिघा संशयितांना एका दिवसाची कोठडी
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तुषार पाटील व ऋषी शुक्ला यांना बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !