चाळीसगावला हौशी सायकलपटूंचा गौरव
पंढरपूर सायकलवारीत सहभाग : १९ तासात नाशिक ते पंढरपूर अंतर केले पार
चाळीसगाव : पर्यावरण संतुलन, इंधन बचत आणि शरीर स्वास्थ असा तिहेरी फायदा देणारी सायकल प्रत्येकाने दरदिवशी चालवली पाहिजे. पायी पंढरपूर वारीला एक परंपरा आहे. पर्यावरणपुरक सायकलवारीने त्याला कळसाचे स्वरुप आले आहे. चाळीसगावचे हौशी सायकलपटू नाशिक ते पंढरपूर सायकलवारीत सहभागी झाले, ही अभिमानाची बाब आहे. असे गौरवोदगार चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी अभयसिंह देशमुख यांनी येथे काढले.
गुरुवारी दूपारी १२ वाजता चाळीसगावातील १० हौशी सायकलपटूंचा डीवाएसपी कार्यालयात गौरव झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपण पंढरपूरचे आहोत. आणि पंढरपूरवारी सायकलवरुन करणा-यांचा गौरव माझ्या हातून होतोयं. हा आनंदाचा क्षण आहे. असेही ते म्हणाले.
सायकलपटू रवींद्र पाटील, टोनी पंजाबी, जिजाबराव वाघ, दिपक देशमुख, योगेश पवार, हर्षल पाटील, भूषण कायस्थ, किशोर महाजन, हेमंत कुलकर्णी, रुंझा पाटील, राजेंद्र वाणी यांनी नुकतीच नाशिक ते पंढरपूर वारी सायकलवरुन पूर्ण केली. त्यांचा नाशिक सायकलिस्ट असोसिएशन तर्फे स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व गौरवपत्र देऊन अभयसिंह देशमुख यांच्या हस्ते गौरव झाला.
१९ तासात पार ४५० किमी अंतर
हौशी सायकलपटूंनी नाशिक ते पंढरपूर हे अंतर अवघ्या १९ तासात पूर्ण केले. यंदा उन्हाची तीव्रता वाढली असतांनाही सायकलपटूंनी ही सायकलवारी ठरलेल्या वेळेत पूर्ण केली. पंढरपुरात पोहचल्यांतर नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण आदि सोहळ्यात सहभागी झाले होते.
रविंद्र पाटील, टोनी पंजाबी, जिजाबराव वाघ यांनी याआधी कोरोना काळात चाळीसगाव ते पंढरपूर सायकलवारी परतीच्या प्रवासासह अवघ्या ६ दिवसात पूर्ण केली होती. त्यांनी ६ दिवसात ११०० किमी अंतर पार केले होते.


