जळगावातून इनोव्हा चोरणार्या आरोपीला औरंगाबादमधून अटक
जळगाव : जळगाव एमआयडीसी हद्दीतून इनोव्हा चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या व तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाणे हद्दीतून मुसक्या आवळल्या आहेत. एजाज जलालद्दीन काझी (51, रा.चेलीपुरा, औरंगाबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी एजाजसह त्याच्या साथीदाराने इनोव्हा चोरी केली होती तर मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर एजाज मात्र पसार होता. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, दादाभाऊ पाटील, रवींद्र पाटील, दीपक शांताराम पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल जाधव, अशरफ शेख, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली. आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


