जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टच सांगितले की….!
जळगाव : वाळू वाहतुकीवर अनेकदा प्रशासनाकडून कारवाई केली जात असलतरी पूर्णपणे वाळू माफियांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश आल्याने या संदर्भात नूतन जिल्हाधिकार्यांना प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाईचे संकेंत दिले.
तहसीलदारांसह शासकीय अधिकार्यांच्या मागे फिरणार्यांवर एमपीडीएची कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जिल्हाधिकार्यांचे कार्यालयात स्वागत
आयुष प्रसाद सोमवारी सकाळी रेल्वेने जळगावात दाखल झाल्यानंतर त्यांनी स्थानिक मुद्यांची माहिती घेतली. मावळते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महसूलचे अधिकारी व महापालिका आयुक्तांशी भेट झाली. वाळूच्या प्रश्नावर अतिरिक्त जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आहे. हे दोन्ही अधिकारी मिळून सविस्तर अॅक्शन प्लान तयार करीत असून बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट सूचना अधिकार्यांना केली आहे.
तहसीलदारांच्या मागे फिरणार्यांवर एमपीडीए लावला जाईल, चोरट्या वाळू व्यवसायात असलेल्या व्यक्तींवर चॅप्टर केसेस दाखल केल्या जातील, हद्दपारी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.


