नावरे गावातील 18 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
An 18-year-old girl from Navare village committed suicide by hanging herself
यावल : यावल तालुक्यातील नावरे गावातील 18 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने तरुणीला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून तरूणीस मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणाली रामकृष्ण मेढे (18) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
कुणी नसताना उचलले टोकाचे पाऊल
प्रणाली ही तरुणी आपल्या घरात एकटी असताना तिने छताला असलेल्या झोक्यासाठी लावलेल्या लोखंडी कडीला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तेथून तिला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रामकृष्ण मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. तरुणीने आत्महत्या का केली ? हे मात्र कळू शकले नाही.



