विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी
निलेश पाटील : इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागात कार्यशाळा
भुसावळ : भारतीय विद्यार्थ्यांची व उद्योजकांची बुद्धीमत्ता व कार्य करण्याच्या क्षमतेनुसार भारतात सर्वाधिक पेटंट असायला हवेत परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी वस्तूंचे पेटंट झाले आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा, पेटंट किंवा कॉपी राईट याबाबत सजग होणे गरजेचे आहे, असे प्रतिपाद केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स विभागात पेटंट एक्सामीनर म्हणून कार्यरत असलेले निलेश शांताराम पाटील यांनी येथे केले. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागातर्फे ‘नविन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 75 प्राध्यापकांनी प्रसंगी सहभाग नोंदविला.

पेटंटमुळे नवीन उद्योग व रोजगार निर्मिती
काही वेळेस जे मूळचे आपले आहे, अशा वैशिष्टयपूर्ण गोष्टींचे पेटंट बाहेरच्या देशातील कंपन्या घेऊ शकतात. त्यामुळे भारतीयांनी अधिकाधिक गोष्टींचे पेटंट मिळवायला हवे. तरुण विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी. एक पेटंट म्हणजे एक ‘इंडस्ट्री’च असते. पेटंट मिळाल्यावर नवीन उद्योगाचा जन्म व शेकडो लोकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळतो. लाखो रुपयाचे उत्पन्न निर्माण होते. तसेच पेटंट झालेल्या वस्तूचा समाजालाही फायदा होतो, असे निले पाटील यांनी पहिल्या सत्रात सांगितले.
नवीन तंत्रज्ञान समाजाच्या फायद्यासाठी -डॉ. सिंह
पेटंटच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान निर्माण होऊन उद्योग जगतात वापर होतो व व्यावहारीकदृष्ट्याही फलदायी ठरते. एखादा शोध समाजाच्या फायद्यासाठी, माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी असेल, तर तो व्यावहारीकदृष्ट्याही फलदायी ठरतो. याचाच अर्थ आपण जो नवा शोध लावणार आहोत, तो उद्योग जगताबरोबरच समाज व्यवस्थेशी सुसंगत आहे ना याचेही भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी व्यक्त केले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यशाळा प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील यांनी परीश्रम घेतले.


