केईएम रुग्णालयात जळगावातील डॉक्टरांची आत्महत्या
Suicide of a doctor in KEM hospital in Jalgaon जळगाव : केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी शिवडीतील टीबी रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून मयत डॉक्टर जळगावच्या गणेश नगरातील रहिवासी आहेत. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. डॉ.आदिनाथ संजय पाटील (27, रा. जळगाव, गणेश नगर) असे मयत डॉक्टरांचे नाव आहे. सोमवार, 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर केईएमसह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कुटूंबाला बसला मानसिक धक्का
मुंबई येथे वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या डॉ. आदिनाथ पाटील हा केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो डॉ. संजय पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा चिरंजीव आहे. सोमवारी 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले.






इंजेक्शन घेत केली आत्महत्या
काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि पुरुषांचा वॉर्ड शिवडी टीबी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे. त्यानंतर, आदिनाथ दोन्ही ठिकाणी उपचार करीत होता. रविवार, 30 जुलै रोजी रात्री तो ऑनड्युटी होता. रात्री एका रुग्णाच्या इकोसाठी तो केईएममध्ये आला होता. रात्री त्याने रजिस्टार सोबत जेवण देखील केले मात्र पुन्हा परतल्यानंतर रात्री शिवडी टीबी रुग्णालयात इंजेक्शन घेवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा उघडला नाही म्हणून परीचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी अशी आदिनाथची ओळख होती. नीट परीक्षेतदेखील त्यांनी जिल्ह्यात स्थान मिळविले. त्याचा भाऊदेखील केईएममध्ये शिकत असल्याची माहिती आहे.


