भुसावळातील व्यापार्‍यांचा यापुढे राज्यातील कुठल्याही बंदमध्ये सहभाग नाहीच


भुसावळ : आधीच बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना सातत्याने या ना त्या कारणाने व्यापारीपेठ बंद ठेवावे लागत असल्याने व्यापार्‍यांवर संकट कोसळले असून यापुढे राज्यातील कुठल्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निश्‍चय शहरातील व्यापार्‍यांनी मंगळवारी कपडा बाजारात आयोजित व्यापार्‍यांच्या बैठकीत केली. त्यानंतर पोलिस प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.

कपडा बाजारात व्यापार्‍यांची बैठक
कपडा बाजारातील बैठकीस व्यापारी राधेशाम लाहोटी, नगरसेवक पिंटू कोठारी, डॉ.विरेंद्र झांबरे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नाना विसपुते, विजय मोनानी, महेंद्र सुराणा, अजय नागराणी यांनी व्यापार्‍यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यापारी एकत्रीतपणे बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. दयापुढे कोणत्याही बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नसून दुकाने उघडी ठेवली जातील, पोलिसांनी दुकानांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. काही महिन्यांपासून आंदोलनांच्या नावाखाली बंदची हाक दिली जाते. या बंदमुळे सामान्य जनता, मजुर व व्यापारी विनाकारण भरडले जात असतात, बंदमुळे व्यापार व बाजारपेठ बंद होवून अनेकांचा रोजगार जातो, बाजारात मंदी येते त्याचा प्रभाव सामान्यांवर पडतो, बंदमुळे साधारण व्यक्तीच्या मुलभुत अधिकारांवर गदा येते शिवाय अनेकदा बंदला हिंसक वळणदेखील मिळते त्यामुळे वारंवारच्या बंद मुळे सामान्यांना होणारे नुकसान व मनस्ताप टाळण्यासाठी यापुढे आम्ही व्यापारी व व्यवसायीक यापुढे कोणत्याही बंद मध्ये सहभागी होणार नाही, आम्ही आमची दुकाने , व्यवसायाची ठिकाणे सुरूच ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. बंदच्या काळात काही अनुसुचित प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहणार असून व्यापार्‍यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर रवी गबेचा, प्रकाश वाधवाणी, राकेश कुकरेजा, अनिल आहुजा, रवींद्र चौधरी, सुशील चौरसीया आदींसह 261 व्यापार्‍यांया स्वाक्षरी आहेत. या निवेदनाची प्रत पोलिस अधिकारी व महसुल विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !