चाळीसगावातील आमसभेत तक्रारदारांना जागेवरच न्याय : कर्तव्यात कसूर करणार्यांवर होणार कारवाई
12 वर्षानंतर आमसभा: स्वातंत्र्यानंतर गुजरदरी जुडणार मुख्य रस्त्याशी : चार तासात बसले तक्रारदाराकडे वीज मीटर
चाळीसगाव : जिल्हा दूध संघाचे चेअरमन, आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी आमसभेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी 12 वर्षांपूर्वी 5 मार्च 2011 रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती. त्यांनतर आज या आमसभेचे आयोजन करण्यात आले. या आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. आमसभेला चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली. आमसभेचे प्रक्षेपण फेसबुक व युट्युबवर लाईव्ह करण्यात आले होते. प्रक्षेपण राज्यभरात लाखो लोकांनी पाहत आजपर्यंत न बघितलेली आमसभा अनुभवली.
तक्रारी संदर्भात स्पष्टीकरणाच्या सूचना
या आमसभेची प्रस्तावना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी आमसभेची पूर्वतयारी, आमसभेचे महत्त्व,तसेच चाळीसगावातील आमसभेचा इतिहास, रुपरेषा याबाबत माहिती सांगितली. विविध विभागांनी त्यांच्या विभागांच्या माहितीसह योजनांची व कामांची माहिती दिली. पीपीटीच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण केले. सादरीकरण झाल्यानंतर त्या विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ऐकून घेतल्या. तक्रारींची पूर्तता करण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश केले. आपल्या विभागातील योजना संदर्भात सविस्तर माहिती व आलेल्या तक्रारी संदर्भात स्पष्टीकरण संबंधित विभागाच्या अधिकार्याने दिले. आमसभेमध्ये मांडलेल्या सर्व समस्या व तक्रारी संदर्भात पुढील पंधरा दिवसात पुन्हा सर्व विभागांची बैठक घेण्यात येऊन त्याबद्दल आढावा घेतला जाणार आहे.

तब्बल सात चालली आमसभा : यांची सभेला उपस्थिती
प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महावितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी हडपे, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव, मेहुनबारे सहा. पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, यांच्यासह 30 हुन अधिक शासकीय विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. आमसभेसाठी 40 विविध विभागाच्या अधिकार्यांची उपस्थिती होती. त्या सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, सर्कल, मुख्याध्यापक हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते. माजी सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक इत्यादी पदाधिकार्यांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 06 वाजेपर्यंत तब्बल सात तास आमसभा सुरू होती.

आमसभा चालू असतानाच दिला लाभ
आमसभा सुरू असताना विविध नागरीकांनी आपल्या तक्रारी आमसभेसमोर मांडल्या. विजय शर्मा यांनी महावितरणकडून घरातील मीटर बदलून मिळावे, अशी आपली समस्या मांडली. त्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्यांना अवघ्या चार तासातच महावितरण कडून मीटर बसवून देण्यात आले. याबाबत विजय शर्मा यांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो व आमदार साहेबांच्या आभाराची पोस्ट प्रसारीत केली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आमसभेमध्ये मांडण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गुजरदरी जोडले जाणार चाळीसगाव तालुक्याच्या मुख्य रस्त्याशी
गुजरदरी हे चाळीसगाव तालुक्यातील नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव. या गावाला जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यामधून जावे लागत होते. जवळपास चाळीसगाव शहरापासून 65 किलोमीटरचा फेरा येथे जाण्यासाठी पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमसभेमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार जूनपाणीपासून ते गुजरदरी पर्यंत स्वतंत्र रस्ता करण्याची घोषणा करण्यात आली.
ऑन द स्पॉट निर्णयामुळे आमदारांचे कौतुक
2021 साली आलेल्या पुरामध्ये बाधीत झालेल्या नागरिकांनी आपले गार्हाणे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या समोर मांडले. त्यांनी लगेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता त्यांनी 02 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी अथवा मंत्रालयात मदत मिळण्यासंदर्भात बैठक लावण्याचे आश्वासन दिले. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या या ऑन द स्पॉट निर्णयामुळे सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
आमसभेत मंजूर झाले 9 ठराव…
आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आमसभेत उपस्थित होत असलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने आमसभेचे ठराव पारित करण्यात येत होते. यात अभिनंदनाच्या ठरावांसह कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आले.
आमसभेत मंजूर झालेले ठराव
- इसरो मार्फत चांद्रयान- 3 यशस्वी करणार्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करणारा ठराव माजी जिल्हा परीषद सभापती पोपट भोळे यांनी मांडला.
- 12 वर्षानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी आमसभा आयोजित केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील मांडला असता उपस्थितांनी टाळया वाजवत त्याला संमती दिली.
- चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी मांडला.
- गावातील विधवा, परितक्त्या, भूमिहीन यांना घरकुल व इतर लाभ देताना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असा ठराव आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडताच उपस्थितांनी टाळया वाचवत त्याचे स्वागत केले.
- नगरपरीषद डम्पिंग ग्राउंडमध्ये वारंवार लागणार्या आगीमुळे टाकळी प्रचा व ओझर भागात होणारे प्रदूषण लक्षात घेता त्याची गंभीर दखल सदर आमसभेत घेण्यात आली. लवकरच याबाबत कचरा डेपो हलविण्यात यावा किंवा जमा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला.
- चाळीसगाव शहरालगत असणार्या गोत्रे मळा ते डेराबर्डी परिसरातील नागरीकांची मागणी लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर भाग हा चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात यावा असा ठराव देखील यावेळी मांडण्यात आला.
- चाळीसगाव एमआयडीसीमधील गुजरात अंबुजा कंपनीमुळे चाळीसगाव नागरी वस्तीत येणार्या उग्र वासामुळे नागरिकांचे होणारे हाल व आरोग्याची हानी चा मुद्दा यावेळी मांडण्यात आला, त्यावर संबंधित कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कार्यवाही करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
- चाळीसगाव शहरात अनधिकृत बॅनर्स यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण व रहदारीस अडथळा येत असल्याने त्यासाठी परवानगी व शुल्क आकारणी साठी एजन्सी नेमण्याची निविदा प्रसिद्ध करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
- चाळीसगाव एमआयडीसीमध्ये प्रस्तावित असणार्या कत्तलखान्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सामाजिक संघटना, नागरिक यांनी देखील विविध माध्यमातून याला लेखी विरोध केला आहे. सदर कत्तलखान्याची मंजुरी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी असा ठराव आमसभेत मांडताच उपस्थितांनी मोठ्या उत्साहात त्याला मंजुरी दिली.
कामचुकार अधिकार्यांना ताकीद
जिल्हा परीषद ल.पा. उपअभियंता चंद्रकांत शिंपी यांच्या बाबतीत देवळी सह डोणदिगर, दहिवद येथील कामांबाबत तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी विषय उपस्थित केला असता संबंधित उपअभियंता शिंपी यांना ताकीद देण्यात आली.

