चिंचोलमध्ये एकाचवेळी निघाल्या आठ जणांच्या अंत्ययात्रा


मुलीच्या लग्नाचा आनंद ठरला औट घटकेचा : निंबोलमध्ये दोघांवर तर चांगदेवात एकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मुक्ताईनगर : एकुलत्या एक मुलीचा विवाह आनंदात पार पडल्यानंतर वराकडील मंडळींनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर हजेरी लावून परतणार्‍या चिंचोलमधील चौधरी कुटुंबावर अचानक क्रुर काळाने घाला घातला व झालेल्या भीषण अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू ओढवल्याने चिंचोल गावावर रविवारी रात्री मोठे संकट कोसळले. सोमवारी दिवसभर गावासह पंचक्रोशीत एकाही घरात चुली पेटल्या नाहीत तर एकाचवेळी शवविच्छेदनानंतर आठ जणांची अंत्ययात्रा निघाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. भरधाव डंपरचे टायर फुटल्यानेच हा भीषण अपघात झाल्याची चर्चा आहे. या अपघातात नववधूच्या आई-वडिलांसह एकुलत्या एक भावाचाही मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ नववधूवर ओढवल्याने सार्‍यांनीच हळहळ व्यक्त केली.

डंपरचा टायर फुटल्यानेच अपघात
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोलचे रहिवासी प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांची कन्या मंजुश्रीचा 30 रोजी चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील यांचे पूत्र प्रतीकशी थाटातविवाह समारंभ झाल्यानंतर रविवार, 2 रोजी चोपडा येथे वराकडील मंडळींनी स्वागत समारंभ (रीसेप्शन) ठेवल्याने चार ते पाच वाहनाने चौधरी परीवारातील सदस्यांसह नातेवाईक खाजगी वाहनांद्वारे चोपडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर नातेवाईक परतीच्या प्रवासात असतानाच कु्रझर (एम.एच.19 सी.व्ही.1772) ला समोरून येणारा डंपर (एम.एच.40 डब्ल्यू 7558) ने धडक दिल्याने 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. डंपरचे पुढील चाक फुटल्याने हा अपघात झाल्याचेही बोलले जात होते. सोमवारी पहाटे 12.30 ते एक वाजेच्या दरम्यान हिंगोणाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

जळगावसह यावलमध्ये शवविच्छेदन
अपघातात मृत प्रियंका नितीन चौधरी, सुमनबाई श्रीराम पाटील, संगीता मुकेश पाटील, रीया जितेंद्र चौधरी तसेच दुपारनंतर मृत्यू झालेल्या क्रुझर चालक धनराज तायडे व शिवम प्रभाकर चौधरी यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर नातेवाईकांनी मृतदेह पाहताच फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता तर अन्य सहा मयतांवर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट
भीषण अपघातानंतर सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी हिंगोणा गावाजवळ झालेल्या अपघातस्थळी भेट देत उपस्थित अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेत त्यांना सूचनाही केल्या.

एकाचवेळी आठ जणांची अंत्ययात्रा
अपघातात चिंचोलमधील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने गावावर मोठे संकट कोसळले. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह आल्यानंतर नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. सहा जणांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तर रीया चौधरी व शुभम चौधरी यांच्यावर दफनविधी करण्यात आला तसेच क्रुझर चालक यांच्यावर दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. चांगदेव येथे एकावर तर निंबोलमध्ये दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या गावातही अपघातानंतर शोककळा पसरली होती. दरम्यान, गावावर कोसळलेल्या संकटांनी एकाही घरात सोमवारी चुली पेटल्या नव्हत्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !