खतांच्या गोणीतील एक कोटी पाहताच दीपले डोळे ; अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा लाचखोर अभियंत्याला दोन दिवसांची कोठडी
राज्यातील सर्वात मोठी कारवाई : नाशिक एसीबीच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक : धुळ्यातील अभियंता गणेश वाघ अद्यापही पसारच
Ahmednagar Maharashtra Industrial Development Corporation bribery engineer jailed for two days नाशिक : एक कोटींच्या लाच प्रकरणात अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा लाचखोर अभियंत्याला पकडल्यानंतर नाशिक एसीबीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 12 तास अत्यंत गोपनीय पद्धत्तीने काम केल्यानंतर हा सापळा यशस्वी करण्यात आला तर तब्बल 15 दिवस आरोपींचे फोन टॅप करून संभाषण तपासल्यानंतर ही कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, तक्रारदाराने खतांच्या गोण्यात एक कोटी भरले व इनोव्हात ते ठेवून आरोपी अभियंता किशोर गायकवाड यास दाखवल्यानंतर त्याची लाच रक्कम मिळत असल्याची पुष्टी झाली. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर लाच रक्कम पाहून आरोपी गायकवाडचे काही वेळ डोळे दीपले व त्याने साथीदार गणेश वाघ याच्याशी संपर्क साधत लाच रक्कम मिळाल्याचे सांगून ही रक्कम कुठे पोहोच करायची, अशी विचारणा केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, लाचखोर अभियंता गायकवाड याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर धुळ्यातील अभियंता गणेश वाघ हा मंत्रालयातून पुणेमार्गे पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


एक कोटींची डील अन आरोपी जाळ्यात
या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीत 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31 कोटी 57 लाख 11 हजार 995 रुपयांचे पाच टक्के रकमेप्रमाणे एक कोटी 57 लाख 85 हजार 995 (पाच टक्केप्रमाणे) व अनामत रक्कम एक कोटी 57 लाख 85 हजार 995 रुपये तसेच या कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94 लाख 71 हजार 500 रुपये तसेच झालेल्या कामाचे अंतिम देयक 14 लाख 41 हजार 749 असे एकूण दोन कोळी 66 लाख 99 हजार 244 रुपये तक्रारदार यांना मिळावे यासाठी आरोपी गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर वाघ यांच्या सह्या घेऊन हे देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात आरोपी किशोर गायकवाड यांनी स्वतः साठी तसेच गणेश वाघ यांच्यासाठी व यापूर्वी अदा केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून एक कोटींची लाच 20 ऑक्टोबर 2023 रोजी मागितली व लाच ठरल्याप्रमाणे रक्कम देण्याचा दिवस शुक्रवार, 3 नोव्हेंबर निश्चित करण्यात आला.
नोटांचे बंड पाहून लावला साहेबांना फोन
तक्रारदाराने खताच्या मोठ्या गोणीत एक कोटींची रक्कम भरली. ती रक्कम आपल्याच इनोव्हा कारमध्ये ठेवून मागच्याच सीटवर गायकवाड यांना बाजूला बसवले. पिशवी उघडून 500 रुपयांचे प्रत्येकी 50 हजारांचे बंडल वरूनच दाखवले. ही रक्कम एक कोटी असल्याची खात्री पटवून वाघ साहेबांशीही बोलून घ्या, त्यांचीही रक्कम त्यातच आहे,’ असे ठेकेदाराने सांगितले. त्यानंतर गायकवाड याने वाघ यांना फोन करुन पैसे मिळाल्याचे सांगितले. त्यांचे संभाषण संपताच पथकाने गायकवाडला ताब्यात घेतले.
दोन वेळा ठिकाणे बदलली
20 ऑक्टोबरपासून ठेकेदार व संशयितांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले जात होते. शुक्रवारी दुपारी नगरमधील आनंद सुपर मार्केट बिल्डिंगच्या बाजूच्या मैदानात पैसे घेण्यास सहायक अभियंता अमित गायकवाड हा येणार होता. तत्पूर्वी संशयिताने तक्रारदारास दोन वेगवेगळी ठिकाणे व वेळा सांगितल्या होत्या. अखेर या मैदानाजवळ कारमध्ये बसून गायकवाडने 1 कोटी घेतले.
अमित गायकवाड एमआयडीसीच्या उपविभागीय कार्यालयातील सहायक अभियंता आहेत. त्याच्या नागापूर (जि. अहमदनगर) व मूळ गाव राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे झडती घेण्यात आली. वाघ यांचे धुळे व पुणे येथील घराचीही झडती घेण्यात आली मात्र त्यात काय आढळले याचा तपशील कळू शकला नाही.
लाच स्वीकारताच केली अटक
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे सापळा रचण्यात आला. संशयित गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत वाहन (एम.एच.20 सी.आर.7777) मधून आला. लाच स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने इशारा देता एसीबीच्या नाशिक येथील पथकाने त्यास अटक केली. दरम्यान, आरोपी गायकवाड याने यावेळी साथीदार तथा अभियंता गणेश वाघ याला एकाच पाकिटाच लाच मिळाल्याचे सांगत 50 टक्के रक्कम कुठे पोहोच करायची ? असे फोनवरून विचारले असता वाघ याने तुझ्याकडे सेफ कस्टडीत ठेव, असे सांगत लाचेला प्रोत्साहन दिल्याने दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने यशस्वी केला.