खबरदार ! महिलांची छेडखानी केल्यास जोड्याने हाणणार
शिवसेना महिला आघाडीचा प्रवर्तन चौकातील फळ विक्रेत्यांना इशारा
मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकातील स्त्रियांच्या सार्वजनिक शौचालयासमोर अतिक्रमण धारक फळ विक्रेत्यांकडून महिला छेडखानीचे प्रकार वाढले असून शाळकरी व महाविद्यालयीन तरुणींनादेखील त्यांचा त्रास सोसावा लागत असल्याने मुजोर टवाळखोरांवर कारवाईसाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह नगराध्यक्षा नजमा तडवी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. संबंधितानी यापुढे कुणाचीही छेडखानी केल्यास त्यांना जागीच ‘जोडे मारो’ आंदोलन केले जाईल, असा सूचक इशारा दिला आहे.
छेडखानीने महिला त्रस्त
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला लागून महिला व पुरुषांसाठी अत्यावश्यक सेवा सार्वजनिक शौचालय आहे मात्र या शौचालयासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून त्यात महिलांच्या सोयीसाठी असलेल्या शौचालयासमोर फळ विक्रेत्यांनी थोडकीच जागा ठेवली आहे. येथून महिलांना शौचालयात जाणे मोठे जिकरीचे होते. त्यात येथे बसणारे फळ विक्रेते हे महिलांची छेडछाड करतात व विनयभंग होईल अशी वाक्य उच्चारत असल्याने ग्रामीण भागातील महिलांचे अनेक वेळा त्यांच्याशी खटके उडतात. या प्रकारातून अप्रिय घटना घडण्याचीही भीती आहे. पंधरवड्यात श्री संत आदिशक्ती मुक्ताईचा यात्रोत्सव असल्याने महिला, तरुणी तसेच भाविकांच्या दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन येथे येतात. टवाळखोर फळ विक्रेत्यांची अशीच मुजोरी राहिल्यास मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे संबंधीतांना ‘जोडे मारो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यांची निवेदनावर स्वाक्षरी
प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना रमेश पालवे, उपजिल्हा संघटीका सुषमा रोहिदास शिरसाठ, तालुका संघटीका शोभा त्र्यंबक कोळी, उपतालुका संघटीका उज्ज्वला अशोक सोनवणे, यशोदा हरी माळी, तालुका समन्वयक सुनीता अनिल तळेले, शहर संघटीका सरीता किरण कोळी, उपशहर संघटीका विद्या प्रशांत भालशंकर, शारदा भोई, नगरसेविका सविता सुभाष भलभले, ज्योती मालचे, भावना गायकवाड, सुनंदा ठोके, उषा पाटील, निर्मला राजपूत, ज्योती भारसके, हसीना तडवी, उषा काचकुटे, अलका आवारे, गीता धनगर, शारदा तळेले यांच्यासह असंख्य महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.


