जळगावातील नगर भुमापन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
बक्षीस पत्राच्या घराची नोंद सिर्टी सर्वेच्या उतार्यावर करण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच
जळगाव : तक्रारदाराचे राहते घर आईच्या नावावरून स्वतःच्या नावावर केल्यानंतर त्याबाबतची नोंद सिटी सर्वेच्या उतार्यावर लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागणार्या जळगाव सिटी सर्वे कार्यालयातील नगर भुमापन अधिकारी प्रमोद प्रभाकर नारखेडे (रामचंद्र नगर, प्लॉट नं.24, जांगीड ब्राम्हण सभा हॉलजवळ, जळगाव) यास पाच हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सहा वाजता रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
लाच स्वीकारताच आवळल्या मुसक्या
जळगावातील तक्रारदाराने आईच्या नावावरून घर स्वतःच्या नावावर केल्यानंतर त्याबाबत सिटी सर्वेच्या उतार्यावर नाव लावण्यासाठी आरोपी प्रमोद नारखेडे यांनी सोमवारी पाच हजारांची पंचांसमक्ष मागणी केली मात्र लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात सोमवारी सायंकाळी लाच स्वीकारताच पंचांसमक्ष त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने,साो, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.


