ही बातमी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची
मुंबई : परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे.
वास्तविक फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये निर्धारीत वेळापूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली होती. मात्र, आता पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे.






नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा एक मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आता दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.


