पोलीस ठाण्यात गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराला 14 पर्यंत पोलीस कोठडी
ठाणे : कल्याण पूर्व भाजपचे आमदार आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर उल्हासनगरमधील पोलीस स्थानकातच सहा गोळ्या झाडल्या. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे राज्य हादरले आहे.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी, गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.


14 पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण चांगलंच भोवलं आहे. उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गायकवाड यांचा मुक्काम 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. पोलिसांनी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत, त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टाने ही गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे.
भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायाधीश ए.ए.निकम यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये फक्त राजकीय वैमनस्याचा प्रश्न नाहीये तर जमिनीचा आणि पैशांचा विषय आहे.यासाठी सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
